‘अथांग’ — निसर्गाच्या विस्तारापासून अंतर्मनाच्या अथांगतेपर्यंत
पुणेस्थित सुप्रसिद्ध चित्रकार विनोद कोरे यांचे ‘अथांग’ हे एकल चित्रप्रदर्शन २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे आयोजित करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली हे विनोद कोरे यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक कलाशिक्षण लातूर येथे झाले असून, त्यानंतर त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून कलेचे उच्च शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या कोरे यांच्या कलाप्रवासात निसर्गाला विशेष स्थान आहे. निसर्गातील विविध घटक, आकार, प्रकाश-छाया आणि वातावरण यांपासून प्रेरणा घेत रंग, रेषा आणि पोत यांच्या माध्यमातून ते स्वतंत्र चित्रभाषा साकारतात.
‘अथांग’ या प्रदर्शनातून वाराणसीच्या घाटांवरील आध्यात्मिक अनुभवापासून कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवनमानापर्यंतचा कलात्मक प्रवास उलगडतो. गंगेचा प्रवाह, घाटांची शांतता, मंदिरे, वास्तू, बोटी आणि पाण्यावर पडणारा प्रकाश या घटकांनी त्यांच्या कलादृष्टीला विशेष प्रेरणा दिली आहे. वाराणसीच्या चित्रांमध्ये केवळ घाटांचे दृश्यात्मक चित्रण न करता तेथील शांतता, अध्यात्म, प्रकाश आणि काळाचा अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील बोटी त्यांच्या चित्रविश्वातील महत्त्वाचा विषय ठरतात. त्यांच्या कलाकृतींमध्ये या बोटी केवळ समुद्रातील वाहने न राहता श्रम, जगण्याची धडपड, प्रवास, प्रतीक्षा आणि आशेचे प्रतीक म्हणून समोर येतात. समुद्र, लाटा आणि बोटी यांच्या माध्यमातून मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते ते संवेदनशीलपणे मांडतात.
जलरंग, अॅक्रेलिक आणि चारकोल या विविध माध्यमांमध्ये काम करताना पारदर्शकता, रंगांचे थर, पोत, रेषा, प्रकाश आणि सावली यांचा प्रयोग त्यांच्या चित्रभाषेत जाणवतो. दृश्याची केवळ प्रतिकृती करण्यापेक्षा त्या दृश्यातून निर्माण होणारी भावना, अनुभूती आणि वातावरण कॅनव्हासवर व्यक्त करण्याकडे त्यांचा कल आहे. राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित विनोद कोरे यांच्या कलाकृती देश-विदेशातील कला रसिकांच्या संग्रहात आहेत. ‘अथांग’ हे प्रदर्शन त्यांच्या सातत्यपूर्ण कलाशोधाचा आणि निसर्गाशी असलेल्या संवेदनशील संवादाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
‘अथांग’ या शीर्षकातून निसर्गाचा विस्तार आणि मानवी मनाचा अंतहीन शोध यांचा सुंदर संगम व्यक्त होतो. गंगेच्या प्रवाहापासून समुद्राच्या विशालतेपर्यंत आणि दृश्यापासून अदृश्याच्या शोधापर्यंतचा हा कलाप्रवास रसिकांना निसर्गाकडे आणि अंतर्मनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करतो.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन समारंभास माननीय श्री. मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री, श्रीमती निधी चौधरी, आयएएस, मुंबई तसेच श्रीमती सपना कार,संस्थापक, बर्गंडी आर्ट गॅलरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चित्रकार : विनोद कोरे
स्थळ : जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी : २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत

.jpeg)

.jpeg)
.jpeg)